Header Ads

Header ADS

मासेमारी बंदी कालावधीत कोळी बांधवांना नुकसान भरपाई - मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख


मुंबई, दि. 9 :- केंद्र शासनाच्या नियमानुसार जून व जुलै या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी असल्याने या कालावधीत कोळी बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. आवश्यकता भासल्यास मदतीच्या निकषात बदल केले जातील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मासेमारी करण्यास बंदी असलेल्या कालावधीत तामिळनाडू राज्यात 2017 सालापासून पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मच्छीमारांसाठी राष्ट्रीय कल्याणकारी बचतीसह मदतीची योजना आहे. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील मच्छीमार कोळी बांधवांना 2017 -18 मध्ये 53 लाख 7 हजार तर 2018 -19 मध्ये 40 लाख 20 हजार एवढा निधी प्रदान करण्यात आला आहे. गत दोन वर्षांसाठी मच्छीमारांसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले अशा मच्छीमारांनाही मदत देण्यात आली आहे. गुजरात, तामिळनाडू व केरळ या राज्यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात जी प्रगती केली आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्यात आला आहे, अशी माहितीही मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,सदस्य सर्वश्री भाई गिरकर, कपिल पाटील, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, डॉ.परिणय फुके, गोपीचंद पडळकर आदींनी सहभाग घेतला.

No comments