महाराष्ट्राची ‘लाल परी’ झाली ७३ वर्षांची…! ; जाणुन घ्या इतिहास
सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या एसटी महामंडळाला आज) 73 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या “परिवहन दिना’निमित्त एसटी महामंडळाकडून जिल्ह्यासह राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, मागील वर्षी प्रमाणे यंदा या लाल परीच्या वाढदिवसावर कोरोनाचे सावट असल्याने, कोणत्याच उपक्रमाचे आयोजन केलेले नाही. प्रत्येक वर्षी परिवहन दिनानिमित्त प्रवाशांना उत्तम सेवा देऊन अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव होणे देखील शक्य नाही.
एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करून महा-कार्गो या नावाने सुरू केलेली सेवा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. मोठमोठ्या कंपन्या व कारखान्यांसमोर मालवाहतुकीचा उभा राहणारा प्रश्न सुटताना दिसत आहे.
2014 पासून एसटी महामंडळाचा वर्धापनदिन हा दिवस “परिवहन दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. एसटीबाबत कर्मचारी, प्रवाशांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, यादृष्टीने वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. बसस्थानकांची सजावट, परिसरस्वच्छता, आगार आणि बसस्थानकात दर्शनी भागात परिवहन दिनाचे फलक, बस स्वच्छ करणे, तसेच बसस्थानके स्वच्छ, सुशोभित केली जातात. विशेष म्हणजे, या दिवशी एसटीच्या सर्व आगारांत उत्तम कामगिरी करणारे वाहक-चालक, यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात येतो. एसटीच्या अधिकाऱ्यांचा प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांशी होणारा संवाद व त्यांच्या अडचणी जाणून घेणे, असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, मोठ्या उत्साहात होणाऱ्या “परिवहन दिना’वर यंदा देखील कोरोनाचे सावट आहे.
73 वर्षांत एसटीचा आवाका
एसटी महामंडळाने 2019-20मध्ये रोज सरासरी 77.12 लाख प्रवासी वाहतूक केली. सध्या महामंडळाकडे 250 आगारे, 568 स्थानके, 18,625 बस, 1,07,500 कर्मचारी आहेत. 59.12 लाख किलोमीटर प्रतिदिन, असा एसटीचा प्रवास आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक विभागात कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना दिलेली होती त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. (आकडे अंदाजित)
कर्मचाऱ्यांच्या समस्या
एसटी महामंडळात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्ता अपूर्ण राहिलेला कामगार करार व कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे त्यादृष्टीने एसटी महामंडळाने महत्वपूर्ण प्रश्न सोडवावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. अत्यंत बिकट अवस्था असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचे लाल परी वरील प्रेम किंचितही कमी झालेले नाही त्यामुळेच एक जून हा लाल परी चा वाढदिवस प्रत्येक कर्मचारी मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो.
No comments