कोल्हापूरमधील वाकरे गावात आढळलेल्या प्राचीन तलावामुळे कोणती रहस्यं उलगडतील?
कोल्हापूर जिल्ह्यातील वाकरे गावात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या तलावामुळे इतिहास संशोधक आणि अभ्यासकांना प्राचीन कालखंडातील महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला वाकरे हे गाव वसलं आहे. या गावात सौरउर्जेच्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे.
ही जागा ग्रामपंचायतीची असून त्या ठिकाणी सोलर निर्मितीसाठी हे खोदकाम करत असताना वाकरे गावात हा प्राचीन तलाव सापडला असल्याचं सरपंच वसंत तोडकर यांनी सांगितलं.
ते पुढे सांगतात, की जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सूरू असताना अचानक आखीव रेखीव पायऱ्या दिसू लागल्या. त्यानंतर काळजीपूर्वक खोदकाम केलं असता इतका मोठा तलाव असल्याचं पहिल्यांदाच कळलं.
या तलावातून लाकडी घाण्याचे साहित्य, जुनी नाणी , बांगड्यांचे तुकडे , मातीच्या घागरी अशा जुन्या वस्तू सापडल्या आहेत. या तलावातून आतापर्यंत हजारो ट्रॉली गाळ काढल्याचं सरपंच सांगतात.
अभ्यासकांच्या मते, हा तलाव बाराव्या शतकात बांधला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
शंभर बाय सव्वाशे फुट आकाराच्या या तलावाचे बांधकाम जांभा दगडात बांधले आहे. हा दगड उष्ण आणि ओलसर प्रदेशात आढळतो. महाराष्ट्रात कोकणात जांभा दगड प्रामुख्याने आढळतो. पण कोकणातून जांभा दगड तलाव बंधणीसाठी कुणी आणला असावा याची उत्सुकता आहे.
हा तलाव कोणत्या कालखंडातील असावा?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनीही या तलाव ठिकाणी भेट दिली. त्यांच्या मते, हा तलाव शिलाहार राजवटीतील असण्याची शक्यता आहे.
ते सांगतात, "वाकरे गावाच्या नदीपलीकडे कसबा बीड हे गाव आहे. हे गाव म्हणजे शिलाहार काळातील लष्करी राजधानी होती."
कोल्हापूर जिल्ह्यातील वळिवडे या गावात शिलाहारांची मुख्य राजधानी होती. शिलाहारांनी केलेली जास्तीत जास्त बांधकामं ही जांभ्या दगडामधे केली होती याचं उदाहरण म्हणजे पन्हाळा गडावरील तटबंदी.
सावंत पुढे सांगतात, "वाकरे गावातील 120 फूट आकाराचा हा तलाव बांधणं, त्यासाठी घाट बांधणे अशी कामं करण्यायासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि पैसा मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे. शिलाहारांची राजवट ही समृद्ध होती म्हणून त्यांच्या राजवटीत हा तलाव बांधला असावा असा अंदाज आहे."
मंदिर रचना आणि मूर्तीशास्त्रज्ञ अभ्यासक उमाकांत राणिंगा यांच्या मते हा तलाव सिंघनदेव कालखंडातील असावा. याचं कारण सांगताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही प्राचीन वास्तू आणि मंदिरं यांची उदारणं दिली आहेत. ते सांगतात, की प्राचीन पद्धतीनुसार वसाहतीच्या ठिकाणी तलाव बांधले जायचे.
सखल भागातील लोकांसाठी तलाव बांधण्याची विशिष्ट रचना शिलाहार काळात तयार झाली. त्यानुसार या कालखंडातील बांधकाम काळ्या पाषाणातील आहेत. याचे उदाहरण म्हणजे अंबाबाई मंदिर, अतिग्रेचा तलाव, रंकाळा तलाव ही काळ्या पाषाणातील बांधकामं आहेत. शिलाहार राजवट संपली तेव्हा 1218 ते 1240 या कालखंडात राज्यसत्ता विस्कळीत होती. त्यामुळे हे बांधकाम शिलाहार काळातील नाही ,असा राणिंगा याचा अंदाज आहे.
ते पुढे सांगतात, "1240 ते 1320 दरम्यान सिंघनदेव यादव राजवट आली त्यानंतर तेराव्या शतकात मुस्लिम राजवट आली. मात्र मुस्लिम राजवटीत हा तलाव बांधला नसावा. याचं कारण म्हणजे या तलावाच्या आसपास कुठेही मुस्लीम चिन्ह आढळलं नाहीये."
मुस्लिम राजवटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट सुरू झाली. याबद्दलचा कागदोपत्री इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हा तलाव सिंघनदेव यादवांच्याच काळातील असावा हा अंदाज योग्य असल्याचं राणिंगा यांना वाटतं.
शिलाहार राजवट संपल्यानंतर अकराव्या शतकाच्या शेवटी आणि मुस्लीम राजवट सुरू व्हायच्या आधी म्हणजे तेराव्या शतकाच्या आधी म्हणजेच बाराव्या शतकातील हा तलाव असावा असा अंदाज राणिंगा यांनी व्यक्त केला.
हा तलाव सिंचनासाठी की धार्मिक विधीसाठी असावा?
या तलावाचा वापर नेमका कशासाठी असावा यावरून वेगवेगळी मतं आहेत.
राणिंगा यांच्या मते, एखाद्या वसाहतीसाठी गावाच्या उंचवट्यावर तलाव बांधला तर नैसर्गिक पाणी सहज उपलब्ध होते. त्याउलट गावाच्या उताराला तलाव असेल तर सांडपाणी त्यात एकत्र होते. त्या दृष्टीने पाहिलं तर वाकरे तलाव नदीकडे जाताना उतारावर आहे. त्या अर्थी. सुरुवातीला वसाहतीसाठी हा तलाव बांधला असावा. पण वसाहत दूर गेल्यानंतर सांडपाणी तलावात यायला लागल्यामुळे तलावाचा वापर बंद झाला असावा आणि त्यात दलदल निर्माण झाली असावी.
ते पुढे सांगतात, "भौगोलिक रचनेनुसार हे गाव सुरुवातीला तलाव आणि नदी यांच्या मध्यभागी असावे. मात्र नदीचे पात्र बदलले आणि त्यामुळे गाव विस्थापित होऊन उंचावर वसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेही तलावाचा वापर बंद झाला असावा."
भौगोलिक रचनेनुसार वाकरे हे गाव घाट मार्गावर येते. त्यामुळं कोकणातून कर्नाटक कडे जाण्याच्या मार्गावर हा तलाव बांधला असावा असा अंदाज इंद्रजित सावंत व्यक्त करतात
त्यांच्या मते नदीच्या जवळ हा तलाव आहे ज्याला 'पुष्करणी' असं म्हटलं जातं. कोकणात अशा प्रकारच्या 'पुष्करणी' आढळतात. याच तलावाच्या ठिकाणी मंदिर असण्याची शक्यता आहे असेही इंद्रजीत सावंत यांना वाटतं त्याचं कारण म्हणजे, अशा प्रकारे बांधकाम असलेली पुष्करणी ही केवळ पवित्र स्थळी बांधली जाते. त्याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिराजवळचे मणिकर्णिका कुंड.
पूर्वीच्या काळी, अशाप्रकारे रचना असलेल्या तलावाचा धार्मिक विधी करण्यासाठी वापर केला जायचा. त्यामुळे नदी जवळ असताना इतका मोठा तलाव बांधण्याची गरज काय असा सवाल ते उपस्थित करतात. त्यामुळे या तलावाचा सिंचनासाठी वापर केला जात नसून केवळ धार्मिक वापरासाठी मंदिराजवळ अशा प्रकारे ही पुष्करणी बांधली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
तलावाच्या बांधकामाची शैली पाहता इथं कोणतंही मंदिर नसणार असा दावा राणिंगा करतात. ते सांगतात, की या तलावाच्या मध्यभागी मंदिर असावं अशी ग्रामस्थांची धारणा आहे. मात्र कोणतंही जलमंदिर बांधताना भक्कम पाया असावा लागतो. पण या तलावाची रचना तशी वाटत नाही.
ते पुढे सांगतात, "जलमंदिर खडकाळ जमिनीत बांधावे लागते. याचे उदाहरण म्हणून वाकरे पासून जवळच बहिरेश्वर मंदिर पहावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्याच्या चार दिशांना चार मंदिर आहे यात पश्चिम दिशेला बहिरेश्वर, दक्षिण दिशेला कुर्गु, पूर्व दिशेला अतिग्रे आणि उत्तर दिशेला तळसंदे ही जलमंदिरं आहेत.
या मंदिरांची रचना एकमेकांसारखी आहे या मंदिराचं बांधकाम 13 व्या शतकातील आहे याचा उल्लेख करवीर माहात्म्य या ग्रंथात आहे त्यामुळे वाकरे तलाव हा 12 व्या शतकातील असेल हा अंदाज पक्का होतो."
हेरिटेज समिती करत आहे अभ्यास
हा तलाव प्राचीन असला तरी अंरक्षित स्मारक असल्याने सध्या या तलावाचा अभ्यास जिल्हा हेरिटेज समिती करत आहे. संरक्षित स्मारकं किंवा वास्तूंचा अभ्यास , जतन पुरातत्व खात्याच्या अंतर्गत केले जाते.
जिल्हा हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांच्या मते , हा तलाव चालुक्य किंव सातवाहन कालखंडातील नाही. तर शिलाहार किंवा यादव काळात अशा प्रकारे तलाव बांधले जायचे.
"पूर्वीच्या काळी काळ्या पाषाणात बांधकाम केलं जायचं पण हा तलाव जांभ्या दगडात बांधला असल्याने नेमका हा तलाव कुणी बांधला असावा याचा अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वीरगळ, शिलालेख, प्राचीन मूर्ती यांचा अभ्यास करुन या तलावाच्या इतिहासाचा अभ्यास केला जाणार आहे. "
वाकरे तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास झाला तर वाकरे गावाचा विकास होईल असं ग्रामस्थांना वाटतं. पर्यटनाच्या दृष्टीने तलावाचे जतन करुन मूळ प्राचीन अवस्थेत विकास केला तर गावातील तरुणाना रोजगाराची संधी मिळेल तसंच गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल, असं उपसरपंच शारदा पाटील सांगतात.
No comments