महापालिकेच्या ऑडीटरांकडून 2,74,07,147 बील कमी
कोल्हापूर ता.20 – दि. 1 एप्रिल 2021 ते दि. 19 जुलै 2021 अखेर कोवीड रुग्णांकडून शहरातील 67 हॉस्पिटलने जादा आकारलेली बिले महापालिकेने नियुक्त केलेल्या 27 लेखापरिक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये संबंधीत हॉस्पीटलकडून शासन नियमापेक्षा जादा आकारलेने रु.2,74,07,147/- कमी करण्यात आले.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खाजगी रुग्णलयातील कोरोना रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्याठी महानगरपालिकेने शहरातील 67 हॉस्पिटलसाठी 27 लेखापरिक्षणकांची नियुक्ती केलेली आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व पथक शहरामध्ये काम करत आहे. या लेखापरिक्षकांचे कामकाज मुख्य लेखापरिक्षक वर्षा परीट यांच्या सनियंत्रणामध्ये सुरु आहे. हे लेखापरिक्षक शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार रुग्णांच्या बिलांची तपासणी करतात.
शहरामध्ये दि. 1 एप्रिल 2021 ते दि. 19 जुलै 2021 अखेर महापालिकेच्या 27 लेखापरिक्षकांनी 67 हॉस्पिटलच्या 8299 बिलांची तपासणी केली आहे. यामध्ये हॉस्पिटलने रुग्णांची रु. 59,78,50,554/- ची बिले केली होती. या बिलांची महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकांनी तपासणी करुन या रु. 2,74,07,147/- बीलामधून कमी केले. विविध हॉस्पीटलची ही रक्कम कमी करुन रुग्णांची रु.5,70,44,347/- ची बीले अंतीम केली आहेत. बीलातून कमी केलेली रक्कम संबधीत हॉस्पीटलकडून रुग्णांना परत केली जाते का याचीही वरिष्ठ अधिका-यांमार्फत चौकशी केली जाते.
लेखापरिक्षक यांनी काही हॉस्पीटलांना जादा घेतलेली रक्कम दाखवूनही ती रक्कम रुग्णांना परत करण्यास काही हॉस्पीटलनी नकार दिला होता. अशा 14 रुग्णांच्या नातेवाईकांच्या बीलाबाबत तक्रारी लेखापरिक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 6 तक्रारी समितीने निकाली काढून संबंधित रुग्णांना डिचार्ज झालेनंतरही रु.1,98,293/- रक्कम परत मिळवून दिली आहे. तर अद्याप 7 तक्रारी समितीकडे असून यावर लवकर निर्णय घेतला जाणार आहे. तरी सर्व रुग्णांनी लेखापरिक्षकांकडून तपासणी करुन झालेनंतरच ती रक्कम हॉस्पीटलला अदा करावी असे आवाहन मुख्य लेखापरिक्षक वर्षा परीट यांनी केले आहे.
No comments