18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी गावनिहाय नियोजन-जिल्हाधिकारी राहूल रेखावार
*लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची माहिती*
*18 वर्षावरील लाभार्थ्यांना मिळणार लस*
कोल्हापूर दि. 17 (जिमाका) -: जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्याचे उददीष्ट ठेवले असून त्यानूसार मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. याअनुषंगाने कोल्हापूर जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये लसीकरण सत्रे सुरु करण्यात आली आहेत. कोविड 19 लसीकरण हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहणार आहे. नेमुन दिलेल्या दिवशी, त्या त्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहून नागरिकांनी कोविडची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये दि 16 जानेवारी 2021 पासुन कोविड लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. जिल्हयाचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जोमाने व शिस्तबध्द पध्दतीने सुरु आहे.
18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. याअनुषंगाने सर्व शासकिय आरोग्य संस्थेमध्ये लसीकरण सत्रे सुरु करण्यात आली असून याठिकाणी 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीनेही 18 वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले असून या गावामध्ये जास्तीची पथके नेमून शिल्लक लाभार्थ्य्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविड 19 लसीकरण वाढविण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती व जनसहभाग मिळणे गरजेचे आहे. कोविड 19 लसीकरण 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना देवून त्यांना संरक्षित करण्यात येणार असून त्याकरीता इतर विभागांचाही सहभाग घेण्यात येत आहे. यामध्ये महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय व गृह विभाग इ. विभागांचा समावेश आहे. या विभागाचे ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी कोविड लसीकरण सत्राच्या ठिकाणी सोशल मोबिलायझेशन, डाटा ऍन्ट्री, जनजागृती इत्यादी कामामध्ये सहभाग घेणार आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये कोविड लसीकरणासाठी पात्र लाभार्थी 31 लाख 26 हजार 917 असून आजअखेर पहिल्या लसीची मात्रा घेतलेले 20 लाख 579 लाभार्थी आहेत. हे प्रमाण 64 टक्के आहे. दुसऱ्या लसीची मात्रा घेतलेले 8 लाख 54 हजार 351 लाभार्थी असून हे प्रमाण 43 टक्के आहे. जिल्हयात सर्व वयोगटातील लस घेतलेले 28 लाख 54 हजार 930 नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे.
18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचे अपेक्षित लाभार्थी 18 लाख 52 हजार 368 असून त्यापैकी पहिल्या लसीची मात्रा घेतलेले 7 लाख 26 हजार 719 इतक्या नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे, हे प्रमाण 39 टक्के इतके आहे. तसेच दुसऱ्या लसीची मात्रा घेतलेले 47 हजार 428 लाभार्थी असून हे प्रमाणा 7 टक्के आहे़ या वयोगटाचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेकरीता जिल्हयामध्ये कोविड लसीकरणासाठी विशेष सत्राचे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 1 हजार 846 इतक्या सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
18 वर्षावरील नागरिकांसाठी गावनिहाय लसीकरण हे मोहिम स्वरुपात होत असल्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर कोविडचे लसीकरण करुन स्वत:चे कोविड आजारापासून संरक्षण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील तसेच आरोग्य व बांधकाम सभापती वंदना अरुण जाधव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळे यांनी केले आहे.
00000
No comments