Header Ads

Header ADS

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत चार बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी पाच लाख साठ हजार भांडवल



कोल्हापूर ता.17 : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत स्थापित बचत गटांना अन्नप्रक्रिया उद्योगांना बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत 31 बचत गटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला ऑनलाईन पद्धतीने पाठविले होते. त्यातील 14 बचत गटांचे प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये चार बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते बीज भांडवल म्हणून 5,60,000/- चा धनादेश वितरण करण्यात आला. सकाळी आयुक्त कार्यालयामध्ये हे धनादेश चार बचत गटांना देण्यात आले. यामध्ये भरारी स्वयंसहायता महिला बचत गट स्नॅक्स आणि बेकरी पदार्थ 2,00,000/-, उत्कर्षा स्वयंसहायता महिला बचत गटास बटाटावेफर्ससाठी 80,000/-, आधार स्वयंसहायता महिला बचत गटास केळीवेफर्ससाठी 80,000/- व नारायणी स्वयंसहायता महिला बचत गटास बटाटाचिप्स, चटणी, शेवया, पापडसाठी 2,00,000/- बीज भांडवल असे 5,60,000/-  कर्जरुपी बीज भांडवल अनुदानाचे चेक वितरण करण्यात आले.

            प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (Prime Minister u Formalization of Micro Food Processing Enterprises) DAY-NULM स्थापित स्वयंसहाय्यता बचतगटांद्वारे सुरु असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगांना बीज भांडवल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दोन किवा त्यापेक्षा अधिक महिला किवा संपूर्ण बचत गट एकच खाद्य पदार्थाशी निगडीत व्यवसाय करत असेल तर त्यांना बीज भांडवल दिले जाते. यामध्ये प्रती सदस्य 40,000/- प्रमाणे भांडवल शासनामार्फत वार्षिक 6% व्याजदराने उपलब्ध होत आहे. महानगरपालिकेस आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 22 बचत गटांचे बीज भांडवल प्रस्ताव ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करण्याचे उद्धिष्ट होते. यामध्ये महापालिकेने 31 बचत गटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ऑनलाईन पद्धतीने शासनाला पाठविले होते. त्यातील 14 बचत गटांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, व्यवस्थापक विजय तळेकर, रोहित सोनुले, निवास कोळी, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

No comments