*धामणी नदी काठावरील नागरिकांनी घाबरु नये; अफवांवर विश्वास ठेऊ नये* *-पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांचे आवाहन*
कोल्हापूर, दि.10: धामणी नदीवर उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळावे, यासाठी स्थानिक शेतकरी ठीकठिकाणी नदी पात्रात मातीचे बांध घालतात. यातील बळपवाडी ता. पन्हाळा व पात्रेवाडी, ता. राधानगरी मधील धामणी नदीतील मातीचा छोटा बांध आज सकाळी फुटला असून हा बांध नदीपात्रात शेतकऱ्यांनी घातला होता. नदीतील बंधारा फुटल्याने यातून बाहेर पडणारे पाणी धामणी नदीपात्राच्या बाहेर जाणार नाही, त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी घाबरु नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
नदीतील असे बांध जलसंपदा विभागाकडून घातले जात नाहीत. तसेच हा बांध दरवर्षी पेक्षा जास्त उंचीचा घातला असण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने धामणी नदीवर असणारे अंबर्डे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत सर्व बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी दि 2 ते 4 डिसेंबर या तीन दिवसासाठी संपूर्ण धामणी नदीवर उपसाबंदी लागू केली होती. परंतु या कालावधीत अंबर्डे बांधाऱ्यापर्यंत पाणी आले नव्हते, त्यामुळे या बाबींचा बांध फुटण्याशी निगडित येत नाहीत, असेही श्री बांदिवडेकर यांनी कळवले आहे.
**********
No comments