शेतकऱ्यांसाठी आता फक्त एक रुपयात पिक विमा 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, दि. 4 : राज्य सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 'सर्वसमावेशक पिक विमा योजना' सुरु करण्यात केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आली आहे. पिकाचा विमा उतरण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत यंदाचा खरीप हंगाम सन 2023-24 आणि आगामी रब्बी हंगामातील 2025-26 मधील अधिसुचित पिकासाठी ही सर्वसमावेशक पिक विमा योजना (कप अन्ड कॅप मॉडेल 80:110) राबविण्यास मंजूरी देण्यात आली असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे व आपल्या पिक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दिवेकर यांनी केले आहे.
पिक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
सध्या ही योजना केवळ अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐैच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुऴाने अगर भाडेपट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
योजनेचा उद्देश-
पिकाच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे.
उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विवधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे.
स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार,
या नुकसानींना मिळणार भरपाई-
हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान.
पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत होणारे नुकसान
नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट
वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पिक क्षेत्र जलमय होणे (भात पिक वगळून)
भूस्खलन , दुष्काळ, पालसातील खंड, किड रोग आदी बाबीमुळे उत्पादनात होणारी घट.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
नैसर्गिक कारणामुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान.
अधिसुचित पिके व अधिसुचित महसूल मंडळ संख्या
1) भात (जिल्हा) - शिरोऴ वगळता इतर सर्व तालुके (67 महसूल मंडळे) समाविष्ठ आहेत.
2) ज्वारी -हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज व आजरा
(45 महसूल मंडळे)
3) नाचणी -हातकणंगले व शिरोळ वगळता इतर 10 तालुके (60 महसूल मंडळे)
4) भुईमुग-गगनबावडा वगळता इतर 11 तालुके (72 महसूल मंडळे)
5) सोयाबीन - शाहूवाडी, गगनबावडा व राधानगरी वगळता इतर 9 तालुके
(54 महसूल मंडळे)
अधिक माहीतीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, युनिव्हर्सल सोंपो इन्शुरन्स कंपनीचे तालुका व जिल्हा प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बॅंका, महा-ई सेवा केंद्र, सर्व सेवा केंद्र (सीएससी) यांच्याशी संपर्क साधावा, अंतिम मुदतीपूर्वी पिक विमा पॉलिसी उतरुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments