Header Ads

Header ADS

१९ फेब्रुवारी रोजी पन्हाळा किल्ल्यावर 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना



कोल्हापूर, दि. १३ : केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राज्यव्यापी 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मुख्य कार्यक्रम पुण्यातील शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमधील कार्यक्रम सकाळी ७:३० वाजता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उद्घाटन भाषणाने सुरु होणार असून पदयात्रा सकाळी ८ वाजता सुरु होवून सकाळी १० वाजता समारोप होणार आहे. किमान ६ ते ८ किमी पायी पदयात्रा शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणी जाणार आहे. 

दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.

 बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपविभागीय अधिकारी पन्हाळा समीर शिंगटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की, जिल्हा पर्यटन समितीचे सदस्य उदय गायकवाड, आदित्य बेडेकर, शिक्षण विभागाचे उदय सरनाईक, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. संदिप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी.ए.आयरेकर, नेहरु युवा केंद्राच्या अधिकारी पुजा सैनी, तहसिलदार पन्हाळा माधवी शिंदे, गट विकास अधिकारी पन्हाळा सोनाली माडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग पन्हाळ्याचे सहायक अभियंता सचिन कुंभार आदी उपस्थित होते.

तळसंगी कॉलेज, वारणा, संजीवनी स्कूल, पन्हाळा पब्लिक स्कूलमधील तसेच आजूबाजूच्या सर्वच शाळा पदयात्रेसाठी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, खेळाडू तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेहरावातील विद्यार्थी असे जवळपास तीन हजार सहभागी होणार आहेत. पदयात्रेच्या दोन दिवस आधी योगा, स्वच्छता दिवस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पदयात्रा ही पन्हाळगडावरील शिवाजी महाराज मंदिर- बुरुज- बाजीप्रभू पुतळा- तीन दरवाजा- अंबरखाना- ग्रामदेवता-अंबाबाई मंदिर मार्गांवर असणार आहे. जयंती दिवशी 395 गावांतील शाळांमध्ये प्रत्येकी 1 किमीपर्यंतची पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच सर्व गडकोट किल्ल्यांवर 19 फेब्रुवारीच्या आगोदर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दिनांक 17, 18 फेब्रुवारी रोजी शालेय स्तरावर योगा घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच देशभक्ती आणि नेतृत्वाचा प्रचार करणे, सुशासनाबद्दल जागरुकता, युवकांचा सहभाग, सामुदायिक एकत्रीकरण आणि स्वावलंबन आणि स्वदेशी भावनेचा प्रचार यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

0000

No comments