एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनचे राज्यव्यापी अधिवेशन उत्साहात संपन्न ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत बदलांना सामोरे जाणार
कोल्हापूर, दि. २७ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आज (दि.27 एप्रिल) रोजी कोल्हापुर येथे संपन्न झाले. वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत, भविष्यातील आव्हानांना एकजुटीने सामोरे जाण्याच्या निश्चयाने या अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनास संपूर्ण राज्यातून महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील अधिकारी उपस्थित राहिले होते.
उद्घाटनाच्या (दि.२६) पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे व कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर म्हणाले, ‘राज्यातील वीज क्षेत्राच्या प्रगतीत अतांत्रिक अधिकाऱ्यांचेही योगदान मोलाचे राहिले आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपनीतील अतांत्रिक अधिकारी यांचे काम हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली आहे. त्याची भविष्यातील निकड लक्षात घेत वीज क्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यानी त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल.’
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ऊर्जा क्षेत्रातील तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती, खासगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण, अतांत्रिक अधिकाऱ्यांची सरळसेवा भरती, पदोन्नती, मनुष्यबळ पुनर्रचना, ग्राहक सुविधा, नव तंत्रज्ञान, कर्मचारी प्रशिक्षण, बदली धोरण, कर्मचाऱ्यांचे प्रश्न इत्यादी विषयावर संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे व अध्यक्ष दिनेश लडकत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या विषयांवर नंतर अधिकारी वर्गाशी सांगोपांग चर्चा झाली. या प्रसंगी ग्राहक व कर्मचारी-अधिकारी यांच्या हितास बाधा पोहचू न देता, कंपनीच्या धोरणांना सहकार्य करू व कंपनीच्या प्रगतीस हातभार लावणार असल्याचे केंद्रीय कार्यकारनीने जाहीर केले. अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात अधिकारी संघटनेच्या पतसंस्थेचा लेख-जोखा मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील वार्षिक अधिवेशन लातूर परिमंडल लातूर येथे घेण्याचे सर्वानुमते ठरल्यानंतर, अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारनीने अधिवेशन ध्वज लातूर सहसचिव अजय गुळवे यांच्यासह संपूर्ण लातूर परिमंडल कार्यकारनीकडे सुपूर्द केला.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर कार्यकारिणीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सचिव श्रीकांत सनगर, शशिकांत पाटील, विश्वजीत भोसले, शंकर सावंत, विनोद खोत, अविनाश कर्णिक, महेश साळोखे, प्रकाश शिंदे, सारंगधर कळसकर, सुहास वडणेकर, उत्तम लांडगे, सुहास भारती, चेतन रोटे यासह कोल्हापूर परिमंडल कार्यकारिणीचे सर्व सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.
सोबत फोटो : पहिल्या सत्रात(दि.२६) अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, भारत पाटील, दिनेश लडकत, संजय खाडे, विजय गुळदगड आदी मान्यवर.
No comments