उद्या चित्रतपस्वी स्व. सूर्यकांत मांडरे यांचे पुण्यस्मरण
उद्या चित्रतपस्वी स्व. सूर्यकांत मांडरे म्हणजे माझे पपाजी यांचे पुण्यस्मरण. अनेक आठवणीची शिदोरी माझ्या जीवनासाठी देऊन आजही मार्गदर्शक म्हणून पपाजी माझ्यासोबत आहेत. लहानपणापासूनच एक अतूट नातं पपाजींबरोबर होतं. एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून आम्हा सर्वांना कधीच वेगळी वागणूक दिली नाही. जे आयुष्य, जो वेळ आपल्या नातवंडांना द्यायचा तो त्यांनी पूर्णपणे दिला. शांत स्वभावाचे पपाजीकडे बोलताना एक आदर आजही आहे तो त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच. घरातील घरपण जपत कलेचा आदरही तेवढाच करत आपली वेगळी छाप उमटविणाऱ्या माझ्या पपाजीबद्दल बोलावे तेवढं थोडंच.
लहान मुलांमध्ये लहान होऊन त्यांच्याशी खेळणारे, खेळताना त्यांना मातीची भांडी तयार करून देऊन त्यांच्याबरोबर जेवण करणारे पपाजी जिथे पाहिले तिथेच एकदा चित्रासाठी हाती कुंचला घेतला की त्यात रममाण होऊन स्वतःला विसरणाऱ्या पपाजीना अनेक रूपात पाहिलंय. मी शिक्षण घेता घेता नोकरी करावी या निर्णयाला घरातून जरी विरोध झाला तरी पपाजींनी पाठी उभे राहून नोकरी करून शिकून स्वतःला कसं तयार करायचं हे त्यांनी शिकवलं. लोकांशी बोलायची कला त्यांच्याकडून आली. विविध प्रसंगातून त्यांनी जगावं कसं हे शिकवलं.
अनेक चित्रपटातून व अभिनयातून पपाजीनी आपली ओळख निर्माण केली. थोरले बंधू स्व.चंद्रकांत मांडरे यांच्या बरोबर त्यांनी एक स्वतःचं एक कलेचं वलय निर्माण केलं. मराठी चित्रपट सृष्टीला आपल्या अभिनय कौशल्याने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. कोल्हापूरच्या मातीतील रांगडेपणा त्यांच्या अभिनय कौशल्यात ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी मनामनात जिवंत ठेवला तो या दोन भावंडांनी. हे नाकारता येत नाही. ज्यावेळी त्यांना अभिनय क्षेत्रातून थांबायचं होत तेव्हा त्यांनी स्वतःच निर्णय घेतला आणि थांबले.अन चित्रकलेला व स्वतःला वेळ दिला. अश्या माझ्या अभिमान वाटणाऱ्या पपाजीना आदरांजली.
- स्वरूपा प्रशांत मांडरे-पोरे
सातारा
No comments