Header Ads

Header ADS

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या - जिल्हाधिकारी दौलत देसाई


  कोल्हापूर, दि.2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या 175 बालकांपैकी दोन्ही पालक गमावलेली 2 बालके आहेत. कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे सर्व्हे करुन त्याचा पाठपुरावा करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केल्या.

कोविड-19 च्या अनुषंगाने बालकांची काळजी व संरक्षणाच्या दृ‍ष्टीने गठीत केलेल्या कृती दल समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, विधी सल्लागार आशिष पुंडपळ हे उपस्थित होते. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे व महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाल्या होत्या. 
 अजूनही गावनिहाय व महानगरपालिका क्षेत्रात अनाथ बालकांचा शोध घ्यावा व त्याची माहिती टास्क फोर्स कडे सादर करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे बालगृहात  कार्यरत कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करुन घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आरोग्य विभागाला केल्या. बालगृह व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या याद्या तात्काळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कोविड बाधित बालकांसाठी शहरी व ग्रामीण भागासाठी कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी कोविड केंद्राची  व्यवस्था जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी  यांनी संयुक्तरित्या करावी. यासाठी आवश्यक कर्मचारी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केल्या.
     00000

No comments