कोरोना प्रसार रोखण्यासाठी मांडरे येथील अनुराम सपोर्ट फौंडेशनचा हातभार..
बालिंगा : प्रतिनिधी :-- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरी भागापुरता मर्यादित राहीला नसुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भाग जास्त प्रमाणात बाधीत होत असल्याचे कोविड-१९ रुग्णांच्या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव व संक्रमण रोखायचे असेल तर त्याबद्दल ग्रामीण लोकांची जनजागृती आणि त्यांच्याच हातात असलेली उपायोजना करणे जरुरीचे झाले आहे.
मौजे मांडरे तालुका- करवीर गावातील अनुराम सपोर्ट फाऊंडेशनने ही बाब प्रकर्षाने माहीत करून घेतली असून त्यावरील उपाययोजना करण्यासाठी म्हणून मांडरे गावात बाधित झालेल्या रुग्णांची आकडेवारी प्राप्त करून घेतली आहे.
चौदाशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात 20 पेक्षा अधिक पेशंट बाधित झाले याची गंभीरता याच गावातील एक सेवाभावी संस्था "अनुराम सपोर्ट फौंडेशन" ने माहित करून घेतली आणि सामाजीक भान राखून गावातील सर्वच्या सर्व लोकांनी मास्क वापरावेत, सॅनीटायझरचा वापर करावा, वेळोवेळी हात साबणाने धुवावेत आणि सामाजिक अंतर ठेवावे याबाबत जनजागृती केली असून अंमलबजावणी योजनाही हाती घेतली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गावातील सर्व लोकांना पुरतील इतके दर्जेदार N- 95 मास्क प्रायोजकांच्या मार्फतीने उपलब्ध करून घेतले. गेल्या आठवड्यात अनुराम सपोर्ट फौंडेशनचे अध्यक्ष मान. अनुज पाटील, सदस्य संपत पाटील व त्यांच्या कुटूंबीय आणि सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत, मांडरे सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांसोबत गावातील नागरीकांना घरोघरी समक्ष जाऊन प्रत्येकाला कोविड प्रतिबंधक N- 95 मास्कचे वितरण केले. एकूण 1500 मास्क गावातील लोकांसाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
त्याबरोबरच या आठवड्यात सह्याद्री सहकारी साखर कारखाना उत्पादीत अतिशय चांगल्या प्रतीचा एकूण 125 लिटर्स सॅनिटायझर ( प्रत्येकी 5 लिटर्स अशा 25 कॅन मधुन ) ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला आहे.
मांडरे ग्रामपंचायात कर्मचारी वृंद समीर मांडरेकर,संग्राम पाटील,आशा सेविका योगिता पाटील,अंगणवाडी सेविका कल्पना पाटील छाया पाटील,कांचन कांबळे,सर्व मदतनीस,प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यानी परिश्रम घेवून ग्रामसेवक व सरपंच यांनी छोट्या बॉटल्स उपलब्ध करून घेवून तो प्रत्येक कुटूंबास वाटप करण्याच्या मोहीमेची जबाबदारी घेवून ती यशस्वी केली आहे. तसेच गावातील सर्व दुकानदार,दुध संस्था यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यापुढे गावातून कोरोनाला हद्पार करण्याचा विडा उचलून कोणीही कोरोना बाधीत रुग्ण नव्याने निर्माण होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचे समस्थ मांडरे ग्रामस्थांनी ठरविले आहे.
याशिवाय सार्वजनीक ठिकाणी विशेषतः ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझर वापरण्यासाठी सेन्सॉरद्वारे स्वयंचलीत असलेले संयंत्र देखील अनुराम सपोर्ट फौंडेशन, मांडरे मार्फतीने ग्रामपंचायत मांडरे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅन्क, शाखा चाफोडी येथे बसविण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी मांडरे गावचे सरपंच सौ.अर्चना पाटील/ उपसरपंच / ग्रामसेवक शरद पाटील / सदस्य /प्रतिनिधी / तसेच प्रतिष्ठीत ग्रामस्थांमध्ये बाजीराव पाटील,रघुनाथ पाटील सर,सरदार पाटील,शामराव पाटील,श्री.दिंडे सर व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अनुराम सपोर्ट फौंडेशनने केलेल्या या भरीव व आजमितीस अत्यावश्यक असलेल्या सर्वसाधने व सुविधांबद्धल पंचक्रोशी व समस्थ मांडरे गावकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे !
No comments