सोलापूर रेल्वे मार्गावरील देवाची गाडी लवकर सुरु करावी : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे मागणी
कोल्हापूर दि.१४ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा अध्यात्मिक नगरी म्हणून सर्वदूर परिचित आहे. सोलापुरातील विठ्ठल मंदिरामध्ये देव विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सोलापूर मध्ये येत असतात. परंतु देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोलापूर पर्यंत आणण्याची महत्वपूर्ण भूमिका असलेली रेल्वे विभागाची देवाची गाडी गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. मिरज, सोलापूर, पंढरपूर मार्गावरील ९ गाड्या सध्या बंद आहेत. मिरज-कोल्हापूर स्थानकातून इतर गाड्या सुरू झाल्या आहेत मात्र सोलापूर कडे कोणतीच गाडी गेल्या दीड वर्षापासून सोडण्यात आलेली नाही. सोलापूरसारख्या महत्वाच्या शहराच्या ठिकाणी रेल्वे व्यवस्था बंद झालेमुळे भाविकांबरोबर, औद्योगीक, शेतकरी यासारख्या अन्य बाबींवर देखील विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना इमेल द्वारे निवेदन सादर केले. सदर निवेदनामध्ये मागणी करण्यात आली कि, सध्या कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली आहे यामुळे पुणे, मुंबई, गोंदिया, गोवा, दिल्ली या ठिकाणी गाड्या धावत आहेत त्याच पद्धतीने सोलापूरसारख्या आध्यात्मिक नगरीत गाड्या सुरू कराव्यात. त्याचबरोबर सोलापूर रेल्वे विभागाकडून मिरज - सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस अल्प प्रवाशांचे कारण देत बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे याबाबत देखील आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. यामुळे सोलापूर रेल्वे मार्गावर देवाची गाडी सुरु झाल्याने तिन्ही जिल्ह्यांचा संपर्क वाढणार असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुरू होणाऱ्या या गाडीमुळे स्थानिकांना रोजगारासाठी पुन्हा चालना मिळणार आहे.
आपल्या प्रयत्नातून देवाची गाडी पुन्हा लवकर सुरु झाल्यास येणाऱ्या आषाढी एकादशीला भाविकांना देव विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शानाने कोरोना संकट काळात आध्यात्मिक बळ प्राप्त होणार आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
No comments