प्रचार करणार्या काही कार्यकर्त्यांचा लूक बदलला
कोल्हापूर ः प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने, विधानसभा, लोकसभा, सहकारी बँका किंवा अन्य सहकारी संस्था यांच्या निवडणुका आल्या की कार्यकर्ते हे आपला नेता किंवा गावातील कार्यकर्ता यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करून प्रचार करत असत.
निवडणुक लागली की संध्याकाळी नेते व कार्यकर्त्यांच्या बैठक होत असत. दुसर्या दिवशी कोणत्या भागात प्रचार दौरा आहे. किती कार्यकर्ते येणार याची यादी तयार केली जात असे. तसेच सकाळचा प्रचार करून झाल्यानंतर घरातूनच बांधून नेलेली भाकरी दुपारी विश्रांतीच्या अगोदर खायला दिली जायची. त्यानंतर दुपारच्या प्रचारसभा सुरू व्हायच्या. संध्याकाळी मोठ्या गावात सभा होत असे. त्यावेळी तिथे चहापानाचा कार्यक्रम होत आणि नेते व कार्यकर्ते संध्याकाळी आपल्या घरी जेवायला घरी जात असे.
पण काळ बदलत गेला तसतसा निवडणुकीतील प्रचाराचा रंगही बदलत गेला. काही नेतेमंडळी आपल्यामागे कार्यकर्त्यांचे पाठबळ खंबीरपणे उभे राहिले पाहिजे यासाठी वेगवेगळे गणित मांडू लागले. कार्यकर्त्यांना आर्थिक रसद तसेच जेवणावळ्या यांना ऊत येऊ लागला. त्यामुळे काही कार्यकर्तेही आपला लूक बदलून आपला आर्थिक लाभ कुणाकडे होईल त्याच्या पाठीमागे धावू लागले आहेत.
कार्यकर्तेही असे वागू लागल्यामुळे काही मतदारही निवडणुकीत आपला आर्थिक फायदा बघू लागले आहेत. जो आपल्याला आर्थिक रसद पुरवील त्यालाच मतदान करू लागले आहेत. मग त्याचे कार्य त्यावेळी बघीतले जात नाही. कोल्हापूरपासून पश्चिमेला असलेल्या एका गावात शेतीला पाणी पुरवणार्या संस्थेच्या निवडणुकीत एका सभासदाने मतासाठी दोन हजार घेतले आणि मतदान केले. तर ग्रामपंचायत निवडणुकीत एका बहाद्दराने आपल्या घरातील मतासाठी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांकडून चाळीस हजार रुपये घेऊन मतदान केले. त्यामुळे निवडणुकीत प्रचार करणार्या काही कार्यकर्त्यांचा व काही मतदारांचा बदलत्या लुकची चर्चा होऊ लागली आहे.
No comments