कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडण्याची परंपरा कायम
प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी. कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या करवीर तालुक्यातील कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही अख्यायिका आहे, गेल्या अनेक शतकांपासून याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. अनेक गावकऱ्यांना गाव भागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत. असाच प्रकार यंदा गावात घडला आहे.
कसबा बीड गावच्या ग्रामस्थ सौ. अनिता तिबीले व सुशिला मांगोरे याना शेतात काम करत असता हा बेडा सापडला आहे.यामुळे कसबा बीड मध्ये यंदा ही सोन्याचा पाऊस पडला आहे हे अधोरेखित झाले आहे.
कसबा बीड गावच्या ग्रामस्थ सुशीला शहाजी मांगोरे यांना गुरव नावाच्या शेती परिसरात शेतात 20 जून रोजी 6 एम एम साईझ चा हा बेडा सापडला आहे.आणि अनिता विष्णू तिबीले यांना 24 जून रोजी तुळशी नदी घाट परिसरातील त्यांच्या शेतात भांगलन करत असता हा बेडा सापडला आहे.हा बेडा हा इतर बेड्यांच्या तुलनेत थोडा मोठा असुन 7 मि.मी. व्यासाचा आहे.
यावर एका बाजुला अलंकृत त्रिशुळाचे अंकण पहावयास मिळते. या त्रिशुळाच्या मध्ये उजवीकडे चंद्र तर डावीकडे सुर्य यांचे अंकण असल्याचे दिसते. बेड्याच्या खालच्या बाजुस चार टिंबांचे अंकण स्पष्ट दिसते. तर मागील बाजूस मध्यभागी थोडासा उंचवटा आहे.या बेड्यावरील कलाकुसर आजही जैसे-थे असल्याचे आढळते. एवढ्या लहानशा नाण्यावर इतके सुस्पष्ट अंकण पाहून आश्चर्य वाटल्यावाचुन राहत नाही. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत. आजही कसबा बीडमध्ये अनेक घरात अशा बेड्यांना दैवी आशिर्वादाच्या स्वरूपात पुजले जाते. गावात सुमारे 40 ते 50 टक्के नागरिकांच्या घरात असे सोन्याची नाणी बेडा असल्याचे बोलले जाते. काही नागरिकांना सोन्याचे नागाच्या आकाराचे वेटोळे असलेले बेडे सापडले आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना नांगरट करताना आजही वीरगळी सापडत आहेत. या सर्वांमुळे कसबा बीड गावाचे ऐतिहासिक महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हे ऐतिहासिक ठेवा यंग ब्रिगेड ग्रुप सदस्य करत आहेत.
चौकट
सुशीला शहाजी मांगोरे,म्हणाल्या
गुरव नावाच्या शेती परिसरात शेतात 20 जून रोजी भांगलन करताना 6 एम एम साईझ चा हा बेडा सापडला. त्याला भक्तीने आम्ही तो देवघरात पुजला आहे.
चौकट
विष्णू तिबीले म्हणाले माझी बायको शेतामध्ये वैरण काढण्यासाठी गेली असता. तिला शेतात बेडा सापडला .
No comments