Header Ads

Header ADS

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेतृत्वांनामिळाली शिवसेना, भाजपमध्ये संधी


कोल्हापूर ः जालंदर पाटील
काँगे्रस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्ह्यामध्ये शिवसेना, भाजपमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीमधून शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करून अनेक दिग्गज नेत्यांनी आमदार, खासदार तसेच अनेक सहकारी संस्थामध्ये पदाधिकारी होण्याची संधी मिळाली.
बाबासाहेब पाटील सरुडकर, दिलीप देसाई हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे. पण 1990 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. त्यामध्ये जिल्ह्यात प्रथमच शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले. पण नंतर त्यांनी काही दिवसांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण त्यांना काँग्रेसने विधानसभेचे तिकीट दिले पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कागलमध्ये संजयबाबा घाटगे यांनीही विधानसभेची शिवसेनेच्या तिकीटावरती निवडणूक लढविली व त्यांनी ती निवडणूक जिंकली. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. पण नंतर काही वर्षांनी ते पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल झाले.
राधानगरी-भुदरगमधून मुळचे राष्ट्रवादीचे असलेले प्रकाश आबीटकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांचा पराभव करून सलग दोन वेळा विजय मिळविला. शाहूवाडीतून  बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सत्यजित पाटील यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली आणि त्यांनी दोन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली. करवीरमध्येही मूळचे काँग्रेसचे असलेले चंद्रदीप नरके यांनी 2009 व 2014 मध्ये शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली व दोन वेळा आमदारकी खेचून घेतली पण तिसर्‍यांदा त्यांना पी. एन. पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कोल्हापूर दक्षिणमध्येही 2014 च्या निवडणुकीपूर्वी अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी काँग्रेसचे दिग्गज सतेज पाटील यांचा पराभव करीत आमदारकी मिळविली. शौमिका महाडिक यांना भाजपचे शिरोली पुलाची मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे तिकीट दिले आणि पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही खेचून घेतले. अमल महाडिक यांची हुकलेली संधी शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदी विराजमान करून पूर्ण केली.  पण सतेज पाटील यांनी नंतर काही वर्षांतच महादेवराव महाडिक यांचा विधानपरिषदेत पराभव करीत महाडिक यांना पहिली राजकीय धोबीपछाड दिली. नंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत  पुतणे ऋतुराज पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळवून दिले. त्यांनी विद्यमान आमदार अमल महाडिक यांचा पराभव केला.
संजय मंडलिक व धैर्यशिल माने हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे. सदाशिवराव मंडलिक व निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावरती खासदारकीची निवडणूक जिंकली. सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक व निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचा व धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा पराभव करून खासदारकी मिळविली व अनेक वर्षांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले.
शिरोळमध्ये उल्हासदादा पाटील हे पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून ती जिंकली.
समरजितसिंह घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांच्या कारखान्याने सहकारात एक आदर्श निर्माण केला आहे. घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली पण यशाने त्यांना हुलकावणी दिली. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. 

No comments