जिल्हा अनलॉक होताना नियमांचे पालन हे हवेच !
प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग.
राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार सद्यस्थितीत जिल्हा अनलॉककडे जात असला तरी तो पुन्हा लॉकडाऊन होणार नाही यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन हे व्हायलाच हवे.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत संपूर्ण जग हे लॉकडाऊन झाले होते. हा विषाणू अदृष्य असला तरी तो सर्वांना तसा नवाच होता. त्यामुळे सुरुवातीला त्याबाबत जनजागृती यावरच जास्तीचा भर देण्यात आला होता. जस जसे आरोग्य तज्ज्ञांनी त्याबाबत अभ्यास आणि संशोधन करायला सुरुवात केली तसतसे त्याबाबतच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. आयुष्यातून कायमचे 'नॉकडाऊन' होण्यापेक्षा 'लॉकडाऊन' कधीही चांगला या उक्तीनुसार लॉकडाऊनचे सूत्र संपूर्ण जगाने स्वीकारले होते. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेऊन सर्वसामान्य घटकांना दिलासा देण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला असला तरी निश्चितच याचा परिणाम विशेषतः उत्पादक, औद्योगिक, व्यापारी घटकांवर झाला. परिणामी महसुलाच्या प्रमाणावरही दिसून आला.
पहिल्या लाटेचा अनुभव घेऊन बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आरोग्याच्या सुविधांवर मोठा भर देण्यात आला. यात प्रामुख्यांने हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांवर विशेष भर आहे. दुसऱ्या लाटेच्या जोडीला लॉकडाऊन सोबतच लसीकरणाची मोठी ढाल आहे. एव्हाना कोरोनाविषयी सुरुवातीला वाटणारी भीती खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन तिची जागा काळजी आणि दक्षताने घेतलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला चाचणीचे अहवाल हे मिरज, कोल्हापूर, रत्नागिरी येथून येत असत सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये दोन प्रयोगशाळा असल्याने आणि मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांची चाचणी विशेषतः रेल्वे स्थानक, जिल्ह्याच्या तपासणी नाक्यांवर रॅपिड ॲँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये दररोज साडे चार ते पाच हजार एकूण चाचण्या होत आहेत.
ऑक्सीजन जनरेशन प्लांट जिल्ह्यात जिल्हा समान्य रुग्णालय आणि कुडाळ एमआयडीसी येथे आहे. सावंतवाडी आणि कणकवली या दोन्ही ठिकाणी प्रगतीपथावर आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथे प्रस्तावित आहे. जिल्ह्याला लागणारी ऑक्सीजनची गरज आणि संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा ऑक्सीजनच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे जात आहे.
राज्य शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत निर्बंधामध्ये थोडीशी शिथिलता आली असली तरी जिल्हा पुन्हा लॉकडाऊन होणार नाही याची काळजी आणि दक्षता प्रत्येकानेच घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा प्रभावीपणे वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, बाहेरच्या जिल्ह्यातून प्रवास करून आल्यावर स्वतःची चाचणी करणे आणि सर्वात महत्वाचे लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे.
00000
No comments