Header Ads

Header ADS

कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ


कोल्हापूर ः जालंदर पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका हा राजकीय विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील नेत्यांनी जिल्हा व राज्य पातळीवर कागलचा राजकीय दबदबा निर्माण केला आहे. हिंदूराव पाटील, शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ या दिग्गज नेत्यांनी जिल्हा व राज्य पातळीवर विविध पदे भूषविली आहेत.
कोणतीही निवडणूक आली की कागल तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश ठरलेला आहेच. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती, आमदार, खासदारकी यामध्ये  कागल तालुक्यातील नेत्यांचे महत्त्व महत्त्वाचे असते. सर्व निवडणुकीत नेतृत्वाचा उगम मात्र कागल तालुका हे ठरलेले असतेच.
हिंदूराव बळवंत पाटील हे तर सहकारातील दिग्गज नेते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. काळम्मावाडी धरणाच्या पायाभरणीला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शामराव भिवाजी पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांनी जिल्हा भूविकास बँकेचे चेअरमनपद भूषविले तसेच पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपदी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची निवड केली होती.
सहकारात देशात व राज्यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते सहकारातील दिग्गज नेते विक्रमसिंह घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्षपद भूषविले. शाहू सहकारी साखर कारखान्याचा आदर्श त्यांनी देशात निर्माण केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शाहू साखर कारखान्याला भेट दिली होती. देशातील व राज्यातील सहकारातील नेते शाहू साखर कारखान्याचा आवर्जून उल्लेख करतात. विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजितसिंह घाटगे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी शाहू साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवून सहकारात दबदबा निर्माण केला आहे.
सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार, राज्याचे मंत्री व साखर कारखान्याचा चेअरमन, केडीसीसी बँकेचे चेअरमन सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर होऊ शकतो हे सदाशिवराव मंडलिक यांनी सिद्ध करून दाखविले. 2009 च्या निवडणुकीत तर त्यांनी अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढविली. अनेक मातब्बर नेते त्यांच्या विरोधात प्रचार करीत असताना त्यांनी सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर खासदारकी पुन्हा खेचून घेतली.  सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणून धुरा यशस्वी सांभाळली तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव करून खासदारकी पुन्हा जिंकली आहे. त्यांनी मंडलिक कारखानाही उत्तम प्रकारे चालवून सहकारात आदर्श निर्माण केला आहे.
सर्वसामान्यांचा श्रावणबाळ अशी उपाधी प्राप्त झालेले व  विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून राजकीय धडे घेत आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत हसन मुश्रीफ यांनी राजकीय झेप घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजकारणातील हिंदकेसरी अशी उपाधी दिली आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत तसेच अल्पावधीतच संताजीराव घोरपडे हा साखर कारखाना उभारून कागलमध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी आणखी एक मंदिर उभा केले आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही आमदारकी तसेच तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाना उभा करून कार्यकर्त्यांना राजकीय ताकद दिली आहे.
माजी खासदार निवेदिता माने यांचे माहेरही कागल तालुक्यातील. निवेदिता माने यांनीही इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून धुरा सांभाळली आहे तसेच त्यांचे पूत्र धैर्यशील माने सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत आहेत.
गोकुळच्या निवडणुकीमध्येही नाविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे यांनी विजय मिळवून कागल तालुक्याला दोन संचालकपदे मिळवून दिली. शौमिका महाडिक यांचे माहेरही कागल तालुक्यातीलच आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली.  त्यांनी गोकुळमध्ये विजय संपादन केल्यामुळे त्यांच्यामुळे तिसरा संचालक कागल तालुक्याला लाभला आहे. 

No comments