शिकाऊ अनुज्ञप्तीकरिता वैद्यकिय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करण्यासाठीवैद्यकिय व्यवसायिकांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रक्रिया फेसलेस होण्याकरिता नमुना 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने अपलोड होणे अनिवार्य ठरते. त्याकरिता वैद्यकिय प्रमाणपत्र जारी करण्यास इच्छुक डॉक्टर्स यांनी अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक डॉक्टरांना स्वतंत्र युजर आयडी देण्यात येईल. संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांनी लॉगीन करून अर्जदारांची नियमाप्रमाणे आवश्यक शारिरीक तपासणी करावी व नमुना १(अ) त्यांच्या स्तरावर प्रमाणित करून ते अपलोड करावे. याकरिता इच्छुक MBBS पदवीधर डॉक्टर्स यांनी दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करावी. तदनंतर केवळ ऑनलाईन पध्दतीनेच नमुना १(अ) स्विकारण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
वैद्यकिय प्रमाणपत्र जारी करण्यास इच्छुक डॉक्टर्स यांनी अर्ज करण्यासाठी पदवीधर डॉक्टर्स यांनी MBBS पदवी प्रमाणपत्र, मेडिकल कॉन्सील ऑफ इंडियाचे नोंदणी प्रमाणपत्र, क्लिनिक चे किमान चार फोटोग्राफ, ओळखपत्र (उदा. EPIC, PAN, Adhar, Passport) इत्यादी कागदपत्रे अपलोड करावीत.
आधार क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्याची दि. 14 जून 2021 पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेसमधून स्वयंचलितरित्या घेण्यात येतो. तथापी, नमुना क्रमांक 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे. नागरिकांची घरबसल्या कामे होण्याच्या दृष्टीकोनातून NIC व्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना क्रमांक १(अ) मध्ये अर्हता प्राप्त डॉक्टरांव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरून अपलोड करण्याची प्रक्रिया विकसीत करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पिंपरी चिंचवड कार्यालय येथे या प्रणालीची तपासणी करण्यात येवून त्याची खातरजमा करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम ८(३) अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरिता व के.मो.वा. नियम ५(१) अन्वये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे. शासनाने दि. 13 सप्टेंबर 2013 च्या आदेशान्वये नमुना क्रमांक १(अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे केवळ MBBS पदवीधर करणारे डॉक्टर्स जारी करू शकतील असे निर्देशित केले असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.
No comments