माडगं..!
सिंधुदुर्गमध्ये आल्यापासून गेल्या चार महिन्यात नाश्त्याला बनवणाऱ्या पोहे, उप्पीट, मोड आणलेली कडधान्ये, उकडलेली अंडी या पदार्थात माडगं आणि भाताच्या पेजेने विशेष स्थान मिळविले आहे. खरं तर माडगं आणि कुळीथ अर्थात हुलगं यांचं विशेष नातं आहे. मी इथे नाश्त्याला नाचणी, बाजरीचं माडगं बनवतो. कारण, ते साहज उपलब्ध आहे. तापानं आजारी पडणाऱ्या व्यक्तीला हुलग्याच्या गोडसर माडग्यासारखं औषध नाही.
माडग्याचं मूळ थेट माझ्या बालपणात रुजलेलं..! त्यानंतरच अर्ध्या आयुष्याच्या वाटेवर असताना आज त्याला नवी पालवी फूटतेय. जिभेवरुन उदरात उतरतंय..ते थेट बालपण घेवूनच..!
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जनक पित्याच्या नावे जयसिंगपूर ही व्यापारी नगरी वसवली. त्यासाठी खास कोल्हापुरातून व्यापारी निमंत्रित केले होते. शेंगा, सोयाबीन, गुळ, तंबाखू यांचे मोठे सौदे येथे चालायचे. तंबाखूचे माहेरघर म्हणूनही शहराची ओळख होती.
पंचक्रोशीतून येथे धान्य येथील अडत दुकानांत यायचे. यात शेंगांबरोबर लालसर हुलगाही असायचा. हाच हुलगा तव्यावर भाजून आई शेजारच्या रफुवाल्यांच्या घरी असणाऱ्या जात्यावर दळून आणायची. दळलेल्या पिठाचं केलेलं उन-ऊन अर्थातच गरम माडगं जर्मन अर्थात अॕल्युमिनीयमच्या ताटलीतून (थाटली) पिताना कोण आनंद व्हायचा. दोन-तीन ताटल्या पिवूनच शाळेला जात असू.
अडत दुकानांच्या रस्त्यावर मोठी ताडपत्री अंथरुन त्यावर शेंगा, हुलगे, तंबाखू वाळत घातलेले असत. सायंकाळी ते पोत्यात भरुन हमाल बैलगाड्यांमध्ये भरत. बऱ्याच वेळा शाळेतून परतताना आम्ही विद्यार्थी ताडपत्रीवर पोती भरताना सांडलेले हुलगे, सोयाबीन, शेंगा गोळा करुन दप्तरात, दप्तर कसले नायलाॕनची किंवा धान्याचीच एखादी पिशवी-पोते असायचे. त्यात भरुन घरी न्यायचो. काहीवेळा बैलगाड्यांमध्ये भरलेल्या वा रचून दुकानांसमोर थप्पी लावलेल्या पोत्याला भोक पाडून हुलगा, शेंगा, सोयाबीन काढत असू. गाडीवानाकडून लटक्या शिवीबरोबरच चाबकाचा फटकारा मिळायचा. एखादा चांगला हमाल, 'खावू दे गरीब' म्हणत बचकभर स्वतःच काढून द्यायचा.
त्यावेळी 'त्याच्यासारखा चांगला माणूस जगात कोण नसायचा.'
खरंतर माडगं मुळातच मातीच्या भांड्यात, गाडग्यात बनवला जाणारा पेय पदार्थ आहे. त्यावरुनच त्याला माडगं म्हटलं जात असावं. काही ठिकाणी त्याला गुळगं असं म्हणत असल्याचे आज समजले. तापाने फणफणणाऱ्या रुग्णांसाठी हा जालीम उतारा असायचा. त्यावेळी अनेकांच्या घरी सकाळी माडगं असायचं. ती जागा सध्या सभ्यतेच्या नावावर चहाने पटकावलीय.
आईने बनवलेल्या अनेक पदार्थांची चव जशी अजून रेंगाळतेय तशीच माडग्याची देखील! सिंधुदुर्ग ने आत्म निर्भर बनविले निदान स्वयंपाकाच्या बाबतीत तरी..!
या...माडगं वा भाताची पेज प्यायला..आपले स्वागतच आहे..!
No comments