सर्वजण मिळून जलसाक्षरतेमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा आदर्श निर्माण करुया* *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि.12: कोल्हापूर जिह्यात पुरेसे पाणी असले तरीदेखील ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या कमी पाण्याचा वापर असणाऱ्या योजनांचा अधिकाधिक वापर करुन सर्वजण मिळून जलसाक्षरता आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याला राज्यात आणि देशात आदर्शवत बनवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमार्फत आज ‘जलसाक्षरता संवाद’ या विषयावर जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदी ऑनलाईन सहभागी झाले. तसेच जलनायक, जलयोध्दा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मी देखील ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पुरेसे आणि स्वच्छ पाणी असेल तर स्वच्छता देखील आपोआप राखली जाते. जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरीदेखील प्रत्येकाने पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ होते. शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सिंचनासारख्या पाण्याचा कमी वापर होणाऱ्या योजना राबवून आदर्श निर्माण करावा. आय.आय.टी.मुंबई, निरी या संस्थांनी मांडलेल्या मॉडेल्सचा उपयोग प्रत्येक गावांनी करायला हवा. प्रत्येक गावात शोषखड्डा तयार करणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात सामाजिक भावनेतून निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था असल्याचे पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने व आजवर काम करताना दिसून आले आहे. जिल्ह्यातील जलदुत, जलमित्र, पाणी व स्वच्छता मित्र या सर्वांच्या सहकार्यातून गाव निहाय आराखडा तयार करुन त्यादृष्टीने जलसाक्षरता घडवण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन करुन श्री. रेखावार म्हणाले, शासकीय पाणीपुरवठा योजनांद्वारे नागरिकांना देण्यात येणारे पाणी स्वच्छ व शुद्ध पुरवले जात असल्याचीही तपासणी वेळोवेळी होणे गरजेचे आहे. पूरपरिस्थिती टाळण्याबरोबरच पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले, स्थानिक स्तरावर कमी खर्चात तयार होणाऱ्या मॉडेलचा वापर करुन पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गावात जलसाक्षरता घडवूया. कोल्हापूर जिल्ह्यात जलसाक्षरतेला सुरुवात करुन हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात जलसंपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु याचा वापर योग्य प्रकारे व्हायला हवा. जलनायक, जलयोद्धे, जलदुत यांच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी प्रयत्न करण्यावर भर द्यायला हवा. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी व पालकांच्या माध्यमातून जलसाक्षरतेबाबत व्यापक जनजागृती होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. सांडपाण्याचा योग्य निचरा करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे, पाण्याचा योग्य प्रमाणात वापर होण्यासाठी जलसाक्षरता रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
उपमहासंचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर जलसाक्षरता व जल प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठात तसेच करवीर तालुक्यातील कारभारवाडी गावात जलसाक्षरतेच्या बाबतीत उत्कृष्ट काम झाले आहे, याप्रमाणे सर्व जिल्ह्यात जलसाक्षरता घडवणे आवश्यक आहे. याकामी जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरण व स्वच्छता मित्र स्वयंसेवक, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यायला हवा.
बैठकीत यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जलसाक्षरता केंद्राची रचना व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन केले.
जलसाक्षरता कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
00000
No comments