अंबाबाई मंदिरातील ई पासची सक्ती रद्द करा भाजपाची निदर्शने जिल्हाधिका-यांना निवेदन
कोल्हापूर दि.२६ महराष्ट्रात अन्य कुठल्याही मंदिरात नसलेली आणि 'केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रमुख मंदिरात' दर्शनासाठी लागू केलेली ई पासची सक्ती बंद करावी आणि सर्व भाविकांना मोकळेपणाने देवीचे दर्शन घेता यावे या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या ई पास सक्तीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर येथे ई पास ची सक्ती रद्द करा, भाविकांना ई पासच्या बंधनात अडकून ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, महाराष्ट्रातील झाली मंदिरे खुले परंतु प.म.देवस्थान समितीचा अद्याप अडमुठेपणा का ?, हिंदू धर्मीयांची प्रेरणास्त्रोत असलेली मंदिरे पूर्वीप्रमाणे खुली करा, मंदिरे बंदमुळे छोटे व्यापारी बेहाल – प्रशासन मात्र खुशाल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कोरोना विळखा कमी झाला असताना सर्व ठिकाणी मंदिरे सुरु झाली परंतु कोल्हापूराच यासाठी वेगळा न्याय काय असा सवाल केला. सरचिटणीस विजय जाधव यांनी ई पासची सक्ती जाचक असल्याचे नमूद करत यामाध्यमातून प्रशासनाला काय सिद्ध करायचे आहे असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर या निर्णयामुळे व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे नमूद केले. सरचिटणीस गणेश देसाई यांनी फक्त हिंदू धर्मियांच्या मंदिरांना ई पासची सक्ती का ? असा सवाल उपस्थित करत प्रशासन हे फक्त आणि फक्त हिंदू धर्मीयांवर अशा पद्धतीची सक्ती करत असल्याचे नमूद केले.
भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर यांनी कोल्हापूरात घडलेल्या अनेक प्रसंगांचे उदाहरण देत प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला. एका बाजूस अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनावर आपण निर्बंध लादलेले असताना अन्य काही धर्मियांच्या गतीविधींकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याचे सांगितले.
यानंतर भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले. उपाध्यक्ष संतोष भिवटे यांनी आजच्या निवेदनाबाबतची भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट केली. परगावाहून आलेले भाविक, शहरातील स्थानिक भाविक, मंदिराभोवती असलेले छोटे व्यापारी-विक्रेते इत्यादी घटकांना कशा प्रकारे या ई पासच्या निर्णयाचा त्रास होत असल्याचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तसेच या ई पासच्या व्यवस्थेला काही पर्यायी व्यवस्था करून पास व्यतिरिक्त दर्शनाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर देवस्थान समितीच्या अखत्यारीतील ज्या मंदिरात आपण दर्शनावर निर्बंध लादले आहेत ते त्वरित उठवावेत अन्यथा याहून तीव्र आंदोलन करून भाजपा ही व्यवस्था स्वबळावर दूर करेल असे निवेदनाच्या माध्यमातून सांगितेल.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, जिल्हा चिटणीस दिग्विजय कालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर, भरत काळे, सचिन सुतार, धीरज पाटील, दिलीप बोंद्रे, महेश यादव, अनिकेत सोलापुरे, राजाराम परीठ, विशाल शिराळकर, प्रवीणचंद्र शिंदे, अनिकेत मुतगी, महादेव बिरंजे, सचिन साळोखे, इक्बाल हकीम, विराज चिखलीकर, प्रदीप घाटगे, गौरव सातपुते, नरेंद्र पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments