ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांसाठीविहीत कालावधीत प्रस्ताव सादर करा - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली, दि. 22, : केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना एका छत्राखाली राबविण्यासाठी अटल वयो अभ्युदय (AVYAY) योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनांसाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी विहीत केलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून विहीत कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा व आरोग्य योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC) व राज्य कृती आराखडा (SAPSrC) या दोन उपयोजनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम व राज्य कृती आराखडा या दोन उपयोजनांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी केंद्र शासनाचे http://grants-msje.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित आहे. या संकेतस्थळावर Annual Action Plan सदराखाली व केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाच्या संकेतस्थळावर योजनांच्या कार्यान्वयनाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार http://grants-msje.gov.in संकेतस्थळावर केंद्र शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करून संबंधित स्वयंसेवी संस्थेने/संबंधित यंत्रणेने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
No comments