*276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर* *- जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार*
कोल्हापूर, दि. 11 - 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकीत मतदान करण्यासाठी मंगळवार दि. 12 एप्रिल 2022 रोजी राज्य शासनाने 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच ही सार्वजनिक सुट्टी 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
मतदानासाठी भरपगारी सुट्टी
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकान्वयेदेखील दि. 12 एप्रिल 2022 रोजी 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
परिपत्रकानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थामध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना ही सुट्टी लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
0000000
No comments