सामाजिक समता कार्यक्रमानिमित्तसामाजिक न्याय विभागाच्या योजनाचा पथनाट्यातून जागर
कोल्हापूर, दि. 10 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज दिनांक १० एप्रिल रोजी समाज कल्याण कार्यालय, डी. के. शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर चौक कोल्हापूर व गडमुडशिंगी, तालुका करवीर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क व मतदार जाणिव जागृती अशा तीन विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले.
गडमुडशिंगी याठिकाणी श्रीरंगशामा शैक्षणिक व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संस्थापक मीरा विकास कांबळे तसेच ग्रामपंचायत मुडशिंगीच्यावतीने सरपंच आश्विनी शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गडमुडशिंगी येथील कुमारी दिपाली रवींद्र कांबळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होऊन अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये राज्यामध्ये प्रथम आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पथनाट्यासाठी दोन्ही ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, डॉ. के. शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्कचे दीपक भोसले, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. उमेश गडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, तसेच सर्व तालुका समन्वयक, वसतीगृह निवासी शाळा, पाचगाव आश्रमशाळा व इतर आश्रमशाळा शिक्षक विद्यार्थी कर्मचारी, सर्व समतादूत यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.
No comments