तमाम कोल्हापूरकर आणि दै. सकाळच्या पुढाकाराने, "पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया" या मोहिमेअंतर्गत काल पिरळ (ता.राधानगरी) पासून सुरु झालेली राजर्षी छत्रपती शाहू कृतज्ञता जलदिंडीचे स्वागत आज कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी दै. सकाळ माध्यमसमूहाच्यावतीने अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचे काम केले जात आहे. पंचगंगा नदी प्रदूषण विरहित करण्यासाठी सकाळ समूहाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ शहराचा नाहीतर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला नदी असो किंवा गावातील तलाव एकूणच जलव्यवस्था बाबतही त्यांचे कार्य आजही आदर्शवत आहेत.
कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, धामणी या नद्यांच्या संगमातून तयार झालेली पंचगंगा नदी ही आपल्या कोल्हापूरची जीवनदायिनी आहे. तिचे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असून यासाठी रु. सव्वा दोनशे कोटींचा आराखडा येत्या तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितींना दिला.
नदी वाचवणे आणि तिला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी सकाळ, कोल्हापुरातील विविध संस्था, कार्यकर्ते यांनी आजवर केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यामुळे, आपण काही प्रमाणात नदीचे होणारे प्रदूषण कमी करण्यात यशस्वी झालो आहोत.
परंतु, हे काम खूप मोठे आणि सतत करावे लागणारे काम आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन यात योगदान देणे आवश्यक आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 'मुठभर राख श्रद्धेसाठी आणि उरलेली शेतीसाठी' हि संकल्पना रबवून पंचगंगेच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करणाऱ्या दै. सकाळचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
या जलदिंडीच्या स्वागतासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयश्री जाधव, सकाळ दैनिकाचे संपादक श्रीराम पवार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments