जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सकाळ वृत्तपत्र माध्यमाच्या वतीने राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचे आणि पंचगंगा नंदीघाट स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.त्या अभियानात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. तर्फे सहभागी होऊन नदीच्या पात्रालगतचा प्लास्टिक कचरा बाहेर काढला.
नदीचं मानवी जीवनातले स्थान अनन्यसाधारण आहे कारण मानवी जीवनाची, संस्कृतीची सुरुवातच मुळी नदीच्या काठी झाली आहे.
पण आज भारतातील नद्यांची अवस्था फार भयंकर आहे.
आपल्या देशातील लोक एकीकडे नदीला माता मानतात, पूजा करतात आणि दुसरीकडे नदीत असंख्य प्रकारचा कचरा टाकतात.
लोक नदीत काय काय टाकतात याचा अंदाज करता येत नाही... प्लास्टिक कागद, बाटल्या कपडे, मुर्त्या,फोटो, डायपर्स, मंडप डेकोरेशनचं साहित्य, प्लास्टिक पत्रावळ्या द्रोण,दारूच्या बाटल्या,उरलेलं जेवण.... यादी संपत नाही. बघून कुणालाही शिसारी येईल. आणि हे सगळं प्रशासनाने म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करावं अशी लोकांची अपेक्षा. आपल्या देशात लोक प्रबोधनाच्या लायकीचे नाहीत असं कधीकधी वाटतं. आर्थिक दंड आणि ढुंगणावर फटके हा एकच मार्ग शिल्लक आहे असं वाटतं. खरं तर प्रशासनाने तसं करायला हवंच. कारण त्याशिवाय लोक सुधारणार नाहीत.
नदीच्या वरच्या भागातल्या लोकांनी काहीही करावं, आणि खालच्या भागातल्या लोकांनी 'काळ्या' पाण्याची शिक्षा सहन करावी हा कुठला न्याय..?
नदी नाही म्हणून व्याकुळ झालेली लाखो गावं आहेत तशीच नदी जवळ आहे पण त्याची किंमत नाही अशीही लाखो गावं आहेत.
प्रदूषणामुळे आज नद्यांचं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाहीय. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी नदीकाठच्या शेकडो गावांची अवस्था आहे. नदी प्रदूषणात प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागतो. आणि त्यातल्या त्यात तीर्थक्षेत्र असलेल्या गावं, शहरांजवळच्या नदीचे हाल तर सर्वाधिक होतात. कारण भक्तीच्या नावाखाली पर्यावरणाचे कसलेच नियम पाळायचे नाहीत किंवा कसंही वागलं तर चालतं असं बहुतेक भाविकांनी गृहीत धरलेलं असतं. त्यामुळे भक्तीच्या नावाखाली लोक अधिकच प्रदूषण करतात हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही.
स्वच्छता मोहिमेत एक पोतं भरेल इतक्या देवी देवतांचे फोटो आणि मुर्त्या सापडल्या....
लोक आता देवाचाही कचरा करायचा सोडत नाहीत...!
इतर वेळी कुणी काही अंधश्रद्धेवर बोललं तर भावना दुखावल्या जातात आणि असे फोटो कचऱ्याबरोबर नदीत टाकताना मात्र भावना दुखावल्या जात नाहीत.
प्रत्येकाला फक्त सोयीचं आणि फायद्याचं पाहिजे असतं. सामाजिक भान, नियमांचे पालन, जबाबदारी हे नको असतं. म्हणजेच धार्मिक बाबतीत सुद्धा आपण खरंतर ढोंगीच असतो.
देवांच्या नावे उदो उदो करणाऱ्या आणि प्रसंगी दंगे करणाऱ्या समाजातलं हे खरंखुरं आणि दुर्दैवी वास्तव!
पर्यावरणाबाबतीत जागरूक असलेल्या सामाजिक संस्थांनी स्वयंसेवकांनी, दरवेळी स्वच्छता करायची आणि इतर लोकांनी सगळा परिसर घाणेरडा करायचा...
हे कधी थांबणार...?
एकदा पर्यावरण विषयक नियम ठरले की त्यात पुन्हा पळवाटा किंवा घाणेरड्या सवयी कशाला...?
कधी सुधारणार आपण..?
येत्या काही वर्षांत सगळ्या नद्या मृत होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जेव्हा असं खरोखर होईल तेव्हा आपण कुठे आणि कसे असू...?
जीवंत तरी असू की नसू...?
याचा विचार आणि उपायांची कडक अंमलबजावणी व्यक्तीगत तसेच सर्वच प्रशासकीय पातळीवर होणे ही काळाची गरज आहे !
~~~~~~~~~~~~
© शरद आजगेकर
No comments