Header Ads

Header ADS

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 चा मंजूर निधी 31 मार्च अखेर पर्यंत खर्च करावा -पालकमंत्री दीपक केसरकर



*जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 च्या 389 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

*महालक्ष्मी मंदिर परिसर, पंचगंगा घाट, रंकाळा तलाव व हेरिटेज स्ट्रीट विकास कामांचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावेत 

*विशेष बाब म्हणून कुस्तीसाठी असलेल्या तालिमांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार

*कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका): सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेला निधी 31 मार्च 2023 अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करावा. संबंधित विभागांनी तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन मंजूर विकास कामावर हा निधी काटेकोरपणे खर्च करण्याचे नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत निधी व्यपगत होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 चा 389 कोटीचा प्रारुप आराखडा तसेच अनुसूचित जाती उपायोजनेचा 116 कोटीच्या प्रारूप आराखड्यास समितीने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. सन 2022-23 ची सर्वसाधारण योजना 425 कोटी व अनुसूचित जाती उपायोजना . 116 कोटीचा मंजूर असलेला निधी 31 मार्च पर्यंत खर्च करावा, असे त्यांनी निर्देशित केले. ज्या शासकीय यंत्रणांचा निधी खर्च होऊ शकत नाही अशा यंत्रणांनी सदरचा निधी तात्काळ नियोजन समितीला समर्पित करावा. जेणेकरून ज्या शासकीय यंत्रणा हा निधी खर्च करु शकतील त्यांना तो विकास कामासाठी देण्यात येईल. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी मंजूर असलेली विकास कामे त्वरित सुरु करावीत, असेही असे त्यांनी सुचित केले. 

कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, पंचगंगा घाट परिसरात विकास कामे राबवणे, ओल्ड पॅलेस ते न्यू पॅलेस पर्यंतच्या रस्ता हेरिटेज स्ट्रीट म्हणून विकसित करणे व रंकाळा परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पुढील सात दिवसात कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाला सादर करावेत, असे निर्देश श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.

     कोल्हापूर शहराला मर्दानी खेळांची विशेष परंपरा आहे. या परंपरेतीलच एक खेळ म्हणजे कुस्ती. या कुस्त्यांचे प्रशिक्षण ज्या तालीमींमध्ये दिले जाते त्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. तरी या तालीमींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली व त्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाने त्वरित नियोजन समितीला सादर करावेत, असेही सांगितले.

       कोल्हापूर जिल्ह्यातील एक ही शाळा नादुरुस्त राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राजाराम कॉलेजसाठी वेगळा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच या ठिकाणी एक आदर्श शाळा निर्माण करण्याबाबत नागरिक व तज्ञ व्यक्ती यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन श्री. केसरकर यांनी यावेळी केले. त्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहकार्य करावे तसेच या अनुषंगाने काही सूचना असतील तर त्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील आठ दिवसात द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना रुग्णांची संख्या काही देशात वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक डोस घ्यावेत. प्रशासनाने सर्वप्रथम आरोग्य विभागात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचे प्रतिबंधात्मक डोस द्यावेत. तसेच नागरिकांनीही कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.

       पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण झाले आहे का याची खात्री करावी. तसेच या आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत मिळवून द्यावी. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसीची मात्रा द्यावी, अशा सूचना श्री. केसरकर यांनी केल्या.

    यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी पुढील सूचना व मागण्या समितीसमोर मांडल्या. इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वीस कोटीची मागणी, कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे, नर्सेस भरती, लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, रस्ता दुरुस्तीची कामे, रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी, कोल्हापूर शहरात दोन-तीन अद्यावत उद्याने उभारणे, स्मशानभूमीचा प्रश्न, वाहतूक व्यवस्था व पर्यटनाच्या अनुषंगाने प्रश्न तसेच विविध विकासात्मक कामासाठी निधीची मागणी यावेळी लोकप्रतिनिधीं कडून करण्यात आली.

      केंद्रीय निती आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाने 'मित्रा' (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) या संस्थेची स्थापना केली असून मित्राचे पहिले उपाध्यक्ष म्हणून राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यानिमित्त पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री. क्षीरसागर यांनी या मित्राच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेपुढील सर्व विषयाचे वाचन केले. तसेच समिती समोर सन 2022-23 चा माहे नोव्हेंबर अखेरपर्यंत झालेला खर्च तसेच सन 2023-24 चा प्रारूप आराखडा मान्यतेसाठी ठेवला.

     यावेळी आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजूबाबा आवळे, पी.एन. पाटील, प्रकाश आबिटकर  व श्रीमती जयश्री जाधव हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याप्रमाणेच या बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यही उपस्थित होते. या निर्वाचित सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

000000

No comments