जिल्ह्यात डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर निधी 100 टक्के खर्च करावा -पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, जिल्ह्यातील दहा डोंगरी गटात डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेला वीस कोटीचा निधी विविध विकास कामावर 100 टक्के खर्च करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात डोंगरी विकास विभाग कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व डोंगरी गटात येणाऱ्या गावांमध्ये विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करावेत. प्रत्येक गटाला मंजूर असलेल्या दोन कोटी निधीतून ही कामे मंजूर करावेत. या भागात सर्व शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी जिल्ह्यातील दहा डोंगरी गटांसाठी डोंगरी विकास विभाग कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत वीस कोटीचा निधी मंजूर असून यातील प्रत्येक गटाला दोन कोटी निधी उपलब्ध होणार असून त्या अनुषंगाने विकास कामाचे प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती दिली.
00000
No comments