Header Ads

Header ADS

बालिंगा येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न



कोल्हापूर, दि. 20: जिल्ह्यातील बालभिक्षेकरी, बालकामगार बालकांना त्यांचे हक्क मिळवून देणे, बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करणे, बालकांचे सर्व प्रकारच्या शोषणांपासून, अत्याचारापासून मुक्ती व संरक्षण करणे, वेळीच बालविवाह रोखणे व पीडित बालकास वेळेत मदत उपलब्ध होण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीमधील अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे कार्य व जबाबदाऱ्या यांची माहिती देण्यासाठी बालिंगा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.

प्रशिक्षणासाठी करवीर तालुक्यातील महसुली गावातील ग्राम बाल संरक्षण समितीमधील अध्यक्ष सरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, सदस्य सचिव असलेल्या अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून एकदिवसीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कामत यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. कामत यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व सांगितले. ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांबरोबर गावातील बालकांना त्यांच्या भाषेत समजेल असे नाटिका, बोलपट, पथनाटय याव्दारे अगदी सोप्या भाषेत कायद्याचा प्रसार व्हावा. तसेच या ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षणासारखे कार्यक्रम व्हावेत, असे सांगितले.

प्रशिक्षणामध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थीना ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य व रचना, बाल विवाह प्रतिबंध कायदा, बालकांचे लैंगिक अपराध कायदा व इतर बालकांविषयी असणारे कायदे व योजना याबाबतची माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक वक्ते बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश पाटील व बाल कल्याण समितीच्या सदस्य अॅड. शिल्पा सुतार यांनी दिली. यावेळी प्रशिक्षणार्थ्याच्या शंकांचे निरसन करण्यात आले व उपस्थित प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.

ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास जिल्हा परिविक्षा अधिकारी सी.डी.तेली, पर्यवेक्षिका विनया कुलकर्णी, संरक्षण अधिकारी विनायक चौगले, नवीन गुरव व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील समुपदेशक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक नविन गुरव यांनी केले. समुपदेशक प्रियांका देवर्षी यांनी सुत्रसंचालन तर करवीरचे संरक्षण अधिकारी विनायक चौगले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

0000000

No comments