Header Ads

Header ADS

*झिका व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी दक्षता घ्या*



     *झिका व्हायरस या डासांमार्फत पसरणाऱ्या विषाणुजन्य आजाराचा फैलाव होवू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. झिका आजार हा एडीस डासामुळे पसरत असून याच डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो.  जिल्ह्यात झिका व्हायरसचे संशयित रुग्ण आढळून येत असून या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून एडीस डास प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. वैद्यकीय पथकांमार्फत नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणीवर भर देण्यात येत असून गरोदर मातांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात औषध फवारणी ही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.*
 
  झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फलॅव्हीव्हायरस प्रजातीचा असून तो एडीस डासांमार्फत पसरतो. 

*लक्षणे -* झिका आजाराच्या अधिशयन कालावधीबद्दल स्पष्टता नाही, पण तो काही दिवसांचा असावा. बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. झिका आजाराची लक्षणे साधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे असून ती सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवसांपर्यत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.

*निदान व उपचार -* राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे येथे झिका आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नसून लक्षणानुसार उपचार केले जातात. बाधित रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी. द्रव पदार्थांचे सेवन करावे. तापाकरीता पॅरासिटामॉल औषध वापरावे. अॅस्पिरीन अथवा एन. एस. ए. आय. डी. प्रकारातील औषधांचा वापर करु नये.

*प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना*
*ताप रुग्ण सर्वेक्षण –*
  झिका आजारामुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाच्या वतीने ताप रुग्ण सर्वेक्षणावर भर देण्यात येत आहे. गरोदर मातांना याचा धोका असल्यामुळे ताप रुग्ण सर्वेक्षण करताना गरोदर मातांकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.
 
*घ्यावयाची खबरदारी -* झिका आजार हा डासांमार्फत पसरत असल्यामुळे नागरिकांनी साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरातील डबकी बुजवावीत अथवा वाहती करावीत. इमारतींवरील व जमिनीखालील पाण्याच्या टाक्यांना डासोत्पत्तीकरीता घट्ट झाकण बसवून घ्यावे. आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात धूरफवारणी करुन घ्यावी. खिडक्यांना, व्हेंट पाईपला डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात. तसेच योग्य त्या डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडावेत. एडीस डास दिवसा चावत असल्याने दिवसा झोपताना देखील मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच झिका आजारासंदर्भात गरोदर मातांनी डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी केले आहे.

शब्दांकन : वृषाली पाटील
            माहिती अधिकारी, 
            जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर
000000

No comments