कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात धावपट्टी विस्तार, एअरबस सेवा आणि नव्या विमानफेऱ्यांबाबत सल्लागार समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूर, दि. २७ : कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयींत वाढ करण्यासाठी विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे संपन्न झाली. समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि समितीचे सदस्य सचिव अनिल शिंदे यांच्यासह अन्य अशासकीय सदस्यांनी उपस्थित राहून विमानतळाच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा केली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला विमानतळाशी संबंधित तांत्रिक आणि प्रवासी सुविधांबाबत सल्ला देणे, हा या समितीचा मुख्य उद्देश असून, कोल्हापूर विमानतळाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
बैठकीत प्रामुख्याने कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यात अशा सूचना सर्वानुमते मांडण्यात आल्या. यासह एअरबस सेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक असलेली ट्रायल लँडिंग प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण झाले असल्याने, धावपट्टी वाढीची भौतिक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे तिकीट दर निश्चित करणे आणि विमानतळावर दर्जेदार टॅक्सी सेवा, अल्पोपहार सुविधा व पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विशेष माहिती केंद्र उभारण्यावरही एकमत झाले. विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑडिटमधील सर्व त्रुटी दूर केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच, विमानतळ परिसरातील रस्ते विस्तारीकरणाला प्राधान्य देतानाच, विस्तारीकरणामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. आजूबाजूच्या गावातील कचरा व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोणीही परिसरात कचरा जाळू नये. तसेच विमानतळ परिसरात २० किलोमीटर परिसरात उंच बांधकामासाठी आवश्यक परवानगी घ्यावी.
विमानतळाचा उपयोग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही केला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या चांदी आणि औद्योगिक साहित्याच्या कार्गो सेवेचा विस्तार करून त्यात स्थानिक फुले, फळे आणि भाजीपाला वाहतुकीचा समावेश करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे ठरले. आगामी वर्षात दिल्लीसह शिर्डी, नागपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी समितीने लावून धरली आहे. याशिवाय, विमानतळ परिसर स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, अखंडित वीज-पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेसह डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. कोल्हापूरच्या विकासात विमानतळ हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली असून, २०१८-१९ मधील १७,८४३ ही संख्या २०२३-२४ मध्ये १,५७,३२० पर्यंत पोहोचली आहे. विमानतळावरून होणाऱ्या नियमित विमानांच्या फेऱ्यांमध्येही मोठी सुधारणा झाली असून, चालू आर्थिक वर्षात म्हणजेच फेब्रुवारी २०२६ पर्यंतच १,५६,६३३ प्रवाशांनी ३०२१ विमान उड्डानांमधून प्रवास केला असून, मार्च अखेर उच्चांकी प्रवाश होईल. ही आकडेवारी कोल्हापूरची वाढती हवाई कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांचा विमान प्रवासाकडे असलेला वाढता कल स्पष्टपणे दर्शवते.

No comments