सिंधुदुर्गनगरी येथून धावली तिसरी श्रमिक विशेष रेल्वे
सिंधुदुर्गनगरी : लॉकडाऊन मुळे गेली दोन महिने जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आज तिसरी श्रमिक विशेष रेल्वे मध्यप्रदेशातील जबलपूरकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण 1 हजार 16 मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
यावेळी प्रवाशांना जिल्हा प्रशासनाच्यवतीने सर्व कामगार व मजुरांची वैद्यकिय तपासणी करुन पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 910 व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 96 व्यक्ती 7 बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील 7 व्यक्ती 1 गाडी, मालवण तालुक्यातील 239 व्यक्ती 12 गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील 267 व्यक्ती 12 गाड्यामधून, सावंतवाडी तालुक्यातील 96 व्यक्ती 4 गाडीमधून,दोडामार्ग तालुक्यातील 93 व्यक्ती 5 गाड्यांमधून, वैभववाडी तालुक्यातील 35 व्यक्ती 2 गाड्यामधून, वेंगुर्ला तालुक्यातील 77 व्यक्ती 4 गाड्या तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील 103 व्यक्ती 5 पाच गाड्या अशा एकूण 52 एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. या वाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक, स्टेशन मास्तर वैभव दामले, देवगडचे नायब तहसिलदार प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांची बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच पुरुष महिला, लहान मुले, वृद्ध यांची घरी जाण्यासाठीची मोठी लगबग या ठिकाणी पहावयास मिळाली.
No comments