एड्स बाधीत रूग्ण व अवलंबित कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ तातडीने द्या- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी इस्लामपूर येथील एआरटी सेंटरच्या नुतनीकरणासाठी 9 लाख 46 हजाराचा निधी मंजूर
सांगली, दि. 14, : एड्स बाधीत रूग्ण व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारे लाभ तातडीने द्यावेत. महिला व बाल विकास विभागाच्या 375 लाभार्थ्यांना तातडीने निधी वितरीत करावा. तसेच रूग्णांचे एआरटी नंबर संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समिती आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, महानगरपालिका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त बी. पी. भांडारकर जिल्हा एड्स नियंत्रण समन्वयक विवेक सावंत व समिती सदस्य उपस्थित होते.
इस्लामपूर येथील एआरटी सेंटरच्या नुतनीकरणासाठी 9 लाख 46 हजार इतका निधी मंजूर आहे. या निधीमधून एआरटी सेंटरची आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, गतवर्षभरात जिल्ह्यात 488 एड्स बाधितांची नोंद झाली असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील 459 रूग्ण असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 173 रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सद्या 5 एआरटी सेंटर असून 8 लिंक एआरटी सेंटर्स आहेत. या सर्व सेंटर्सनी एड्स चाचण्या, पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या याबाबतची आकडेवारी अद्ययावत करावी. कोरोनाच्या सद्यस्थितीत एड्स नियंत्रण करणेही महत्वाचे असून यासाठी एड्स चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. एड्स बाधितांना मदत देताना सादर करण्यात येणाऱ्या याद्या सदोष असाव्यात यासाठी शोध मोहिम राबविण्यात यावी.
जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी रक्त संकलन केल्यानंतर एचआयव्ही बाधित रक्त नाही याबाबत तपासणी करावी. ज्या रक्तामध्ये एचआयव्ही संक्रमण आढळेल अशा व्यक्तींची माहिती तातडीने शासकीय यंत्रणेकडे पाठवावी. एड्स बाधितांच्या नोंदीसाठी असणाऱ्या R-15 रजिस्टर मधील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एड्स बाधितांना संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना अशा योजनेतून मदत देण्यासाठी सर्वेक्षण करावे. त्याचबरोबर क्षयरोगावर उपचारही करण्यात यावेत. जिल्हा एड्स मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
No comments