कोल्हापूर -गगन बावडा राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला
प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी.:-कोल्हापूर - गगन बावडा राज्य महामार्गावर बालिंगा व दोनवडे गावच्या दरम्यान असलेल्या ब्रिटिश कालीन भोगावती नदीला पुराचे पाणी कमी झाल्यामुळे मंगळवार सकाळपासून या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर गेल्या गुरुवारी रात्री 11 वाजता कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर दोनवडे गावच्या पूर्वेला असलेल्या मोहरी नजीक रस्त्यावर महापुराचे पाणी आल्याने या मार्गावरील गगन बावडा व तळकोकणात जाणारी वाहतूक बंद झाली होती. शुक्रवारी या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येऊन वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती.
फक्त अत्यावश्यक सेवेसाठी आपत्कालीन योजनेची बोट कार्यरत ठेवण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान एक ते दिड फूट पाणी असल्यामुळे केवळ पायी जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. टू व्हीलर पासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी या मार्गावरील महापुराचे पाणी ओसरून रस्ता रिकामा झाल्याने वाहतूक पूर्णपणे सुरु करण्यात आली.वाहतूक सुरु झाल्याने या परिसरातील जनजीवन सुरळीत सुरु झाले. तसेच सोमवारी रात्री गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या वाहनांनी गोकुळ कडे दुध पुरवठा केला. सध्या दोनवडे येथे रस्त्याखाली सुमारे फूट भर पाण्याची पातळी गेली असून परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
No comments