Header Ads

Header ADS

अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांना सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा निरोप; अभ्यासू व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या किशोर पवार यांचे कार्य महत्वपूर्ण : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे गौरवोद्गार


कोल्हापूर, :  अभ्यासू, वाखाणण्याजोगे व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या किशोर पवार यांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गार काढून त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे होणारी पोकळी नेहमी जाणवत राहील, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले.

  अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा भेट देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माजी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, श्री. पवार यांच्या पत्नी रश्मी पवार यांच्यासह कुटुंबिय, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात काम करताना प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाण ठेवून मनापासून काम करायला हवे. आपलं काम चांगल्यात चांगलं होण्याचा आग्रह धरुन कर्तव्यपूर्ती करावी.
 प्रशासनात अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची सोबत असेल तर निश्चितच नागरिकांना चांगली सेवा देता येते, याची प्रचिती किशोर पवार यांच्या कामातून आली. महसूल विभागातील जमीन, गौण खनिज यासह विविध विषय मार्गी लावण्यामध्ये श्री. पवार यांचा वाटा महत्वपूर्ण आहे. महसूल विभागात काम करताना प्रत्येक विषय अभ्यासूपणे मार्गी लावण्याची हातोटी किशोर पवार यांच्याकडे होती, असे मत व्यक्त करुन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी श्री. पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, श्री. किशोर पवार यांनी आजवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम केले. कोरोना प्रतिबंधासाठी त्यांनी
सूक्ष्म नियोजन केले. योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करुन रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे ऐकून घेवून ते काम मार्गी लावण्याचं कसब श्री.पवार यांच्या अंगी होतं, अशा शब्दांत श्री. चव्हाण यांनी  त्यांचे कौतुक केले.
माजी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कुटुंबियांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगते व्यक्त केली. श्री. पवार हे कष्टातून यशस्वी झालेले मितभाषी, करारी, अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

*सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून आजवर कार्यरत*
 *- अपर जिल्हाधिकारी किशोर पवार* 

  महसूल विभाग हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विभाग आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून आजवर काम केलं, असे सांगून 'जग खूप चांगलं आहे, जगाकडे चांगल्या नजरेतून बघा, जग चांगलं दिसेल. स्पर्धेच्या युगात कामाचा ताण वाढत आहे. अशावेळी गतीने आणि प्रामाणिकपणे काम पूर्ण करा, असा मूलमंत्र श्री. पवार यांनी मनोगतातून दिला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची सर्वसामान्यांसाठी गतीने, संवेदशीलतेने काम करण्याची पद्धत, अधिकाऱ्यांच्या कामावर दाखविलेला विश्वास यामुळे चांगले काम करता आले, अशी भावना श्री. पवार यांनी व्यक्त केली.
     ******

No comments